कोरोनाचा काळ चांगला की वाईट? मला तर माहिती नाही, पण एक मात्र निश्चित ज्या लोकांना व्यायामाची, योग, प्राणायाम, किंवा काही कलेची आवड होती त्यांच्यासाठी हा कोरोनाचा काळ नक्कीच अशादायी, नवा प्रगतीचा मार्ग दाखवणारा होता. लाखो तरुणांनी या संधीचा फायदा उचलत सोशल मीडिया, व्यवसाय, उद्योग, नव्या कल्पनांना जन्म देत स्वतःची, समाजाची, देशाची प्रगती साध्य केली. थोडक्यात कोरोनाचा काळ हा स्वतःची अन देशाची कात टाकण्यासाठीच आला होता.
पहाटे 5 ला उठून औदुंबरला जातं व्यायामाची अतिशय चांगली सवय कोरोना काळात मला लागली. औदुंबरच अध्यात्मिक वातावरण, व्यायाम करताना समोर कृष्णा नदी, नदीकाढी असणाऱ्या नारळाच्या झाडांनमधून दिसणारा सूर्योदय अन सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेत व्यायाम करणे म्हणजे थेट स्वर्गातून सवारी करत फिरून आल्याचा ब्रम्हानंद तोही अगदी रामप्रहरी❤️
एके दिवशी ब्रह्मांनंदाचा अनुभव घेत असताना एक अनोळखी व्यक्ती औदुंबर वृक्षाच्या खाली बसला होता. पांढरी कपडे घातलेला अन अंगावर शाल पांघरून मस्त आमच्या सारखाच आनंद घेत होता. फरक इतकाच की आम्ही व्यायाम करत होतो, तो मात्र शांत बसून होता.
व्यायाम पूर्ण झाल्यावर दत्त मंदिरात जातं असताना त्यांच्याशी बोलण्यासाठी थांबलो. सहज विचारलं काय करता? कुठून आला ? वेगैरे वेगैरे. त्या व्यक्तीने परिचय करून दिला. कुठून तरी मध्य महाराष्ट्रमधून आला होता. कारण विचारलं तर बोलला, मी इथे ध्यानधरणा करण्यासाठी आलो आहे. दोन चार दिवस थांबणार नंतर पुढे निघून जाणार. आम्ही तर चाट पडलो ध्यान करण्यासाठी इतक्या लांब. जवळपास अर्धा तास गप्पा चालू होत्या. अर्थातच गप्पा या ध्यान या विषयावर चालू होत्या. खूप काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. अर्ध्यातर त्यावेळी डोक्यावरुन गेल्या पण जाताना डोक्यात प्रकाश पाडून गेल्या. इतका प्रकाश पडला की मला त्यांच्याशी बोलताना समोर दिसणारा सूर्याचा प्रकाश काही क्षणभर फिक्का वाटला. गाठभेट संपली. उद्या परत भेटू याच विषयावर अधिक चर्चा करू. असं बोलून आम्ही निघालो.
दुसऱ्या दिवशी व्यायामला गेलो पण तो व्यक्ती काही दिसला नाही. दोन चार दिवस झाले तरी तो व्यक्ती पुन्हा काही दिसला नाही. पुढे काही दिवसांनी व्यायामला येणारे कमी झाले. कधी कधी मी एकटाच यायला लागलो पण नियमितपणा सोडला नाही.
एक दिवस व्यायाम करताना सहज मनात विचार आला. ह्या माणसाने जाता जाता आपल्या जे काही सांगितले ते करण्याचा प्रयत्न केला तर ? म्हटलं बघू करून आज पासून व्यायाम झाला की ध्यान करू. जशी व्यायामाची जागा फिक्स तशीच ध्यान करण्याची जागा फिक्स केली औदुंबरचा तो औदुंबर वृक्ष. काही दिवसांनी मात्र मस्तच प्रोग्राम सेट झाला होता, व्यायाम करून नंतर ध्यान मग दत्त दर्शन.
नंतर काही दिवसांनी ध्यान मात्र जमेना. आता आली का पंचायत. कितीही प्रयत्न केला तरी पूर्वी सारखा अनुभव किंवा आनंद मिळेनासा झाला. अर्धवट माहितीच्या आधारे केले की असचं होणार नां? मला जाणवलं ध्यान या विषयावर जरा अभ्यास करू वाचन करू. हळू हळू शिकू योग्य शास्त्रीय माहितीच्या आधारे.अभ्यासाने असाध्य साध्य होतें. अभ्यास आपल्याला एका अनिश्चितेच्या तिरावरुन निश्चितेच्या पैल तैरावर घेऊन जातो. अभ्यास हवाच.
आता ही ध्यान या विषयावर योग्य माहिती कुठून घ्यायची? क्षणात उत्तर मिळाले स्वामी विवेकानंद. माझ्या घरात भरपूर पुस्तके आहेत. त्यातील स्वामी विवेकानंद यांनी लिहलेली सुद्धा आहेत. त्यातील ध्यान धरणा हे पुस्तकं माझ्या हाती पडले आणि सुरु झाला नवीन टप्प्यावरील नवा प्रवास. थोडक्यात असे म्हणा की स्वामी विवेकांनंद अन दत्तगुरूंच्या मार्गदर्शन आशीर्वादा खाली मी हे शिकण्याचा प्रयत्न करत होतो. पुस्तकातमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो धर्म परिषद मधील काही घटनांचा उल्लेख केलेला होता. सहज मनात विचार आला. आपल्याला अमेरिकेची संधी होती पण हुकली. आता पुन्हा मिळेल कां? कोरोनाची दोन वर्ष संपली. दरम्यान आटपाडी मधील घर झाले. माझी कित्येक छोटी मोठी manifestation पूर्ण झाली. आणि अचानक बायको मयुरीला अमेरिकेच्या visa साठी लॉटरी मध्ये नंबर लागला अन सुरु झाला नवा अध्याय. नवा टप्पा.
डिसेंबर 2023 ला सह कुटूंब अमेरिकेत आलो. माझी मोठया पगाराची नोकरी सोडावी लागली. ब्रह्मांड आपली इच्छा पूर्ण करत असताना ब्रह्मांडाला आपल्या दुसऱ्या हाताने काहीतरी द्यावे लागते. एक मोठं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण झाले अखेरीस पूर्ण झाले. अमेरिकेला पाय लागलाच तोही सहकुटुंब. पहिले तीन चार महिने सगळं स्थिर होण्यात गेले. नवीन लोकांशी ओळख गाठभेट होतं होती. आमचे पुण्यातील खूप जुने मित्र अभिजित म्हस्के हे ही अमेरिकेत होते त्यांनीही आम्हाला अमेरिकेत येताना योग्य माहिती दिली होती. एके दिवशी त्यांचा फोन आला या फिरायला आमच्याकडे तुझ्या ठिकाणाहून माझ्या ठिकाणी यायला डायरेक्ट ट्रेन आहे. बघा येतातय का? परत होणार नाही. फोन ठेवला अन आम्ही ट्रिप जमेल का याचा विचार अन नियोजन करायला लागतो. ट्रिप ला जाण्याचं ठिकाण होतं शिकागो ❤️
कोरोना काळात स्वामी विवेकांनंद यांचे ध्यान धरणा विषयी पुस्तकं वाचताना शिकागोचा उल्लेख होता. अन अमेरिकेत आल्याबरोबर शिकागोच बोलावण आलं? हा योगायोग की ब्रह्मांड पाठीशी असल्याचा संकेत. विचारांना अस्तित्व असते हे खरेच आहे
अविस्मरणीय असा ट्रेनचा प्रवास करत आम्ही शिकागोला पोहचलो. शिकागो युनियन स्टेशनला उतरताच प्रवासाचा संपूर्ण थकवा क्षणात निघून गेला. शिकागो व्हायब्स काही औरच. जगातील प्रख्यात वास्तूस्थापत्य केलेचा नमुना इथं आहे. मित्र अभिजित म्हस्के यांच्याकडे गेलो. अतिशय आनंदाने, हसतमुखपणे स्वागत. आदरांतिथ्य कसे करावे हे ह्यांच्या कडून शिकावे. अगदी फिरायला जाताना चहा पासून सर्व व्यवस्था चोख. दोन दिवसात संपूर्ण शिकागो डाउनटाउन पायी फिरलो. वेगवेगळी प्रसिद्ध ठिकाणे पाहिली. शिकागोच्या चैतन्यदायी व्हायब्स अनुभवल्या.
ट्रिपच्या अखेरच्या दिवशी मात्र ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये भाषण केले होते त्या ठिकाणी जाण्याचा योग शेवटी गाठून आलाच. आर्ट इन्स्टिटयूट ऑफ शिकागो या ठिकाणी असणाऱ्या सभागृहात स्वामी विवेकानंदयांनी 1893 साली झालेल्या धर्म परिषदमध्ये भाषण करत जगाला भारतीय धर्म, संस्कृती याचा परिचय करून दिला होता.
आर्ट इन्स्टिटयूट मध्ये तिकीट काढण्याच्या ओळीमध्ये उभा राहिलो. प्रत्येकी 35$ तिकीट. तिकीट काढताना समोरच्या व्यक्तीला बोललो की "आम्ही भारतातुन आलो आहोत". पुढंच वाक्य बोलायच्या आताच तो बोलला, तुम्हाला स्वामी विवेकानंद यांनी भाषण केलेलं ठिकाण पहायचे आहे? आम्ही हो बोललो. पहिला ते मग बाकीचं इन्स्टिटयूट. त्याने आम्हाला तिकीट दिले आणि बोलला चला माझ्या बरोबर. त्याने मागच्या लोकांना तिकीट न देता. लाईन बंद केली अन आम्हाला सोबत घेयून गेला. आम्ही खूपच आश्चर्य चकित झालो.
त्या सभागृहाबाहेर स्वामी विवेकानंद यांचा सोनेरी रंगात लावलेला फोटो भारत मातेची शान अमेरिकेत अधिक उंचावत होता. शंभर सव्वाशेवर्षापूर्वी कोणी आला अन भाषण करून गेला. आजही त्यांचे शब्द जगाला मार्गदर्शन प्रेरणा देत आहेत. त्या व्यक्तीने सभागृहाचे दार उघडले अन आम्ही आत प्रवेश केला. आतमध्ये पाऊल ठेवताच मला कोरोना काळात औदुंबरला स्वामी विवेकानंद यांचे वाचलेले पुस्तक आणि तो क्षण आठवला. त्यावेळेसचा अमेरिका पाहायला मिळेल कां? हा विचार आणि आजचा दिवस यामध्ये 3 वर्षाचे अंतर होतें. अमेरिकेत आल्यावर स्वामी विवेकानंद यांनी पहिल्यांदा आम्हाला शिकागोलाच कसं बोलवून घेतलं असेल? आम्ही इथं कसे पोहचलो? आम्हाला हे कसं शक्य झाले? यासारखे असंख्य प्रश्न मनात पडले. पण पुढच्याच क्षणाला स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचे त्या सभागृहात आजही गुंजनांऱ्या शब्दांनी माझ्या त्या सर्व प्रश्नाची उत्तरे दिली. ध्यान हा ब्रम्हाण्डसोबत जोडले जाण्याचा खरा मार्ग अन आपल्या इच्छा पूर्ण मार्गी लागण्याचा. एकदा का आपण जोडले गेलो की ब्रह्मांड आपल्या कोणत्याही इच्छा अपूर्ण ठेवत नाही. आपला गुलामच होतो जणू. मनिफेस्टेशनच हे अंतिम सत्य.
जवळपास 45 मिनिटं मी त्या सभागृहात होतो. त्या स्टेजवर मी ही भाषण देत आहे अशी कल्पना करत माझी ऊर्जा वाढवली जी मला आजही सोशल मीडियावर काम करण्यासाठी उपयोगी पडत आहे. त्या सभागृहात बसून समोर स्वामी विवेकानंद भाषण देत आहेत अशी कल्पना करत असताना कानात टाळ्यांचा आवाज घुमत होता. त्याच टाळ्या ज्या 125 वर्षापूर्वी या सभागृहात गुमल्या होत्या. आजही त्याठिकाणी आपल्याला ऐकू येतात. आजतागायत कित्येक मोठया लोकांनी याठिकाणी भाषण केली आहेत पण फक्त एका भारतीयाचा सोनेरी फोटो या सभागृहात लावलेला आहे यावरून आपल्याला स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे महत्व समजावून येते. याठिकाणी त्यांनी केलेल्या भाष्णाची प्रत मिळते. मी ही त्या घेतल्या. समाधानी झालो.
आता काढता पाय घेण्याची वेळ झाली. संपूर्ण सभागृह डोळ्यात सामावून घेत असताना जीवनातील पुढचा मार्ग सोनेरी दिसतं होता, कानात त्या टाळ्यांचा कडकडाट घुमत होता, समोरच्या सोनेरी फोटोला पाया पडत असताना अचानक उलघडा झाला भारतीय बुद्धिमत्तेच्या रहस्याचा. भारतीय बुद्धीमत्तेच रहस्य आहे, आपली प्राचीन संस्कृती, योग, प्रणायाम, ध्यान अन त्याआधारे विश्वाचे कल्याण.
Reviewed by Vaibhav Kavade
on
Wednesday, December 17, 2025
Rating:


No comments: