अरे व्वा! ब्रह्मांडाच्या आशीर्वादाने आपल्या इंस्टाग्रामवरील एकशे एकवीस फॉलोवर्सनी ज्ञानेश्वरी वाचायला सुरू केली. याची इंस्टाग्रामला स्टोरी लावली असता, काही मित्रांनी अडाणीपणामुळे किंवा अज्ञानामुळे किंवा उत्सुकतेपोटी प्रश्न केला, की मॅनिफेस्टेशन( प्रकटीकरण ) आणि ज्ञानेश्वरीचा काय संबंध? ज्ञानेश्वरी वाचनामुळे प्रकटीकरण कसे करायचे हे समजते का?
खरेतर त्यांचा प्रश्न अगदी रास्त आहे. कारण आजकालच्या जमान्यात प्रकाटीकरणाविषयी जो बाजार मांडून ठेवलाय, त्यातून लोकांच्यामध्ये चुकीच्या समजुती निर्माण होत आहेत. जसं की, मागा , कोणतातरी चमत्कार होईल आणि प्राप्त होईल. प्रत्यक्षामध्ये असं होत नसतं. प्रकटीकरणाचा थेट संबध हा आपल्या मनाशी आहे. आपले मन घडवण्याशी आहे.
ज्ञानेश्वरी हा इच्छापूर्तीचा ग्रंथ नाही. तो मनुष्यनिर्मितीचा ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी तो सांगितला, लिहला आहे
आजकाल “मॅनिफेस्टेशन” या संकल्पनेभोवती अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. केवळ इच्छा व्यक्त केली, सकारात्मक विचार केले, की काही चमत्कार, गोष्टी घडतात, असा एक समज रूढ होत आहे. परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकटीकरणासाठी सर्वप्रथम मनाची तयारी, आत्मविश्वास, आत्मपरीक्षण आणि योग्य कृती आवश्यक असते.
ज्ञानेश्वरी वाचण्याने आपले मन घडते. आपल्या मनात विचार, भाव, श्रद्धा निर्माण होतात आणि अशा प्रकारचे मन प्रत्यक्ष प्रकटीकरणामध्ये कृती करताना कामाला येते. ज्ञानेश्वरी आपल्या मनाला, बुद्धीला योग्य दिशा देते. त्या मिळालेल्या दिशेतून आपण आपले कार्य, कृती निर्वघ्नपणे पार पाडू शकतो. प्रकटीकरण करताना लोकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो. आत्मपरीक्षणाचा अभाव असतो. ज्ञानेश्वरी वाचल्याने आपण स्वतःचे आत्मपरीक्षण करायला शिकतो. म्हणजेच आपण स्वतःला समजून घ्यावं लागतो. आपले अंतर्मन घडायला लागते, स्वजाणीव वाढायला लागते.
अर्जुन जेव्हा युद्धभूमीवर उभा राहिला, तेव्हा त्याचे मन विचलित झाले होते. त्याच्या मनात भीती, संभ्रम, मोह आणि कर्तव्याबद्दल प्रश्न निर्माण झाले होते. अशा वेळी भगवान श्रीकृष्णांनी त्याला जे जीवनतत्त्वज्ञान सांगितले, ते म्हणजे भगवद्गीता. आणि त्या भगवद्गीतेचे मराठीतील रसाळ, लोकभाषेतील रूप म्हणजे ज्ञानेश्वरी.
ज्ञानेश्वरी वाचल्याने आपल्या मनामध्ये खोल आणि सूक्ष्म विचार निर्माण होतात. खरे सुख बाहेर नसून आपल्या अंतर्मनातच दडलेले आहे, याचा साक्षात्कार ज्ञानेश्वरी आपल्याला करून देते.
ज्ञानेश्वरीच्या चिंतनातून आपल्या मनामध्ये सकारात्मक, दैवी आणि तेजस्वी विचार निर्माण होतात. मन प्रसन्न, आल्हाददायक आणि स्थिर बनू लागते. आपल्या विचारांमध्ये खोली येते, विवेक जागृत होतो आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक बनते.
त्याचबरोबर आपल्या वाणीमध्ये रसाळपणा येतो, शब्दसंपत्ती समृद्ध होते आणि अभिव्यक्ती अधिक प्रभावी व अलंकारिक बनते. आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये गोडवा, संयम आणि सौजन्य निर्माण होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मनाला कुशलतेने विचार करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते.
ज्ञानेश्वरीचे वाचन केवळ बौद्धिक ज्ञान देत नाही, तर मनाला प्रसन्नता आणि स्थैर्य प्रदान करते. प्रसन्न मन हेच मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठे सामर्थ्य आहे. जेव्हा मन प्रसन्न असते, तेव्हा विचार स्पष्ट होतात, निर्णयक्षमता वाढते आणि कृतीमध्ये उत्साह निर्माण होतो. प्रसन्न मन जीवनाला प्रगतीकडे घेउन जाते.
ज्ञानेश्वरी म्हणजे आपल्या मनाला आणि जीवनाला योग्य दिशा दाखवणारी ज्ञानगंगा आहे. ज्ञानेश्वरी वाचल्याने आपल्याला ब्रह्मांडाची रहस्ये समजतात. ब्रम्हज्ञानाविषयी माहिती मिळते.
ज्ञानेश्वरी आपल्याला केवळ विचार करायला शिकवत नाही, तर योग्य विचारांपासून योग्य कृतीपर्यंतचा प्रवास घडवते. जसे गीतेने अर्जुनाला युद्धासाठी तयार केले, तसेच ज्ञानेश्वरी आपल्याला जीवनातील प्रत्येक संघर्षाला धैर्याने आणि विवेकाने सामोरे जाण्यास तयार करते.
वैयक्तिक माझ्याबाबतीत सांगायचे झाल्यास, ज्ञानेश्वरी वाचनातून मला अनेक अनुभव प्राप्त झाले. या वाचनाने केवळ माझे ज्ञान वाढले नाही, तर माझ्या मनामध्येही मोठे परिवर्तन घडून आले. नकारात्मकपणा दूर झाला. भीतीदायक विचार कमी झाले. त्याजागी आत्मविश्वास वाढला. मन साहसी झाले आणि हेच रिपोग्रॅमिन्ग झालेले मन मी माझ्या वैयक्तिक इच्छा पूर्ण करण्यासाठी - कृती करण्यासाठी म्हणजेच प्रकटीकरणासाठी यशस्वीरित्या वापरले.
थोडक्यात काय, मित्रांनो, तर ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे आपले मन प्रकटीकरणासाठी उत्तमरीत्या तयार होते. आजच्या भाषेत सांगायचे तर, ज्ञानेश्वरीमुळे आपल्या माइंडसेटमध्ये परिवर्तन घडते. आपण स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहू लागतो, आत्मपरीक्षण करू लागतो आणि आपल्या विचारांची, भावनांची व कृतीची पुनर्रचना करू लागतो. आधुनिक भाषेत यालाच “माइंड रीप्रोग्रामिंग” किंवा “मेंटल रिवायरिंग” असे म्हटले जाते.
Reviewed by Vaibhav Kavade
on
Monday, June 29, 2026
Rating:

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
ReplyDelete